आज समाजात अपंग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप काही चांगला नाही. त्यांना मिळणारी वागणूक सन्मान देणारी वाटत नाही. त्यामुळे अनेक अपंगांना त्यांचा कुठलाही दोष नसतानाही आपण कुटुंबावर, समाजावर भार आहोत की काय, असे वाटायला लागते. समाजातील अपंग व्यक्तींना सन्मानाने वागवायला हवे. त्यांना त्यांच्या अपंगत्वाचा तिरस्कार न वाटता एक स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे. नैतिकता आणि समान वागणूक जर लक्षात घेतली तर सर्वांना अपंग व्यक्तींप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव होऊ शकते. माणूस हा समूहात राहणारा समाजप्रिय प्राणी असल्याने सर्व प्रकारच्या व्यक्ती एकत्रच राहात असतात. त्यामध्ये जर आनुवांशिकतेने किंवा अपघाताने अपंगत्व आले असेल तर इतर नातेवाईकांनी आणि शेजारील लोकांनी मोठ्या मनाने त्यांचा स्वीकार केला पाहिजे.
राष्ट्राच्या विकासात सामान्य माणसांएवढाच अपंग, दिव्यांग असलेल्या नागरिकांचा सहभाग असेल तर ते राष्ट्राच्या हिताचेच राहील. परंतु दुर्दैवाने समाजाकडूनच समाजातील दिव्यांगाकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. दिव्यांग व्यक्ती किती दुर्लक्षित आहे, याचा अनुभव अनेकांना आलेला असतो; नव्हे तो येतोच. त्यांचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी अपंग व्यक्तीच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी पुढे आले पाहिजे. दिव्यांगांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, पण त्याचा फारसा उपयोग त्यांना होत नाही. कारण त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. या दिव्यांगांचा राष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या क्षमतेनुसार व्यावहारिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इत्यादी विविध क्षेत्रात जीवनात समरसता आणत असतानाच हे दिव्यांग बंधूंना या जगात स्वावलंबनाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगता येईल याच शुद्ध हेतूने २० जून २००८ रोजी नागपूर येथे समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ म्हणजेच ‘सक्षम’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सशक्तीकरण करण्यासाठी स्वतःला झोकून देणारे सक्षम हे एक राष्ट्रीय संघटन आहे. सक्षम ही संस्था दिव्यांगांच्या विकासासाठी चार प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रित कार्य करीत आहे.त्यामधील १) शिक्षण, २) आरोग्य ३) स्वावलंबन आणि ४) सामाजिक विकास. या चारही मुद्यांचा विचार करून सक्षम संस्थेतर्फे स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर अधिवेशने तसेच चर्चासत्रे, कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. सक्षमतर्फे दिव्यांग सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यमातून १) रोजगार मार्गदर्शन, २) शिक्षण मार्गदर्शन, ३) कायदेविषयक मार्गदर्शन, ४) आरोग्य चिकित्सासंबंधी माहिती, ५) शासकीय योजनांची माहिती आणि सूचना, ६) संगणक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, ७) दिव्यांग प्रमाणपत्र कसे प्राप्त करायचे याबाबतचे मार्गदर्शन, ८) स्वयंरोजगारासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती, ९) नेत्र बँक व्यवस्थापन इत्यादीची माहिती दिली जाते. सक्षमतर्फे नागपूर येथे माधव नेत्र पेढी सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून नेत्रदानासंबंधी जनजागृती, कॉर्निया संकलन, कॉर्निया प्रत्यारोपण करण्यात येते.
मध्यभारत आणि विदर्भामध्ये स्पेक्युलर माईक्रोस्कोपयुक्त एकमात्र नेत्र बँक म्हणून ओळखले जाते. कॉर्नियल अंधत्व मुक्त भारत अभियान आणि अंधत्व मुक्त गाव या माध्यमातून देशातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क आणि समन्वयातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून हजारो गरजूंवर निःशुल्क शस्त्रक्रिया करून त्यांना लाभान्वित करण्यात आले. संस्थेतर्फे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी माधव ऑडिओ बुक लायब्ररी सुरू करण्यात आली असून ऑक्टोबर २०१९ पर्यंत ४५० पेक्षा जास्त अंध विद्यार्थी या ऑडिओ बुक लायब्ररीचे सदस्य झाले आहेत. अब्रार हे असे एक उपकरण आहे की, या उपकरणाच्या साहाय्याने अंध विद्यार्थी अगदी सहजपणे ऑडिओ बुकच्या माध्यमातून आपला अभ्यास करू शकतात. ऑक्टोबर २०१९ पर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी अब्रार या उपकरणांचा उपयोग करून घेतला आहे. नागपुरातील काही महाविद्यालयातील ग्रंथालयात हे उपकरण उपलब्ध आहे.
सुदर्शन समदृष्टी – लहान मुलांमधील डोळ्यातील तिरळेपणा दूर करण्यासाठी सक्षमतर्फे काही स्थानिक हॉस्पिटलच्या सहकार्याने तिरळेपणा असलेल्या मुलांवर निःशुल्क शस्त्रक्रिया करून त्यांना चष्मे वितरित करण्यात आले. आतापर्यंत ५४ कॅम्पच्या माध्यमातून १६७९ तिरळेपणा असलेल्या लहान मुलांवर उपचार करून ६६८ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोणत्याही संस्थेला त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यात रुची आणि क्षमता असलेल्या कार्यकत्र्यांची, त्यातल्या त्यात तरुण कार्यकत्र्यांची आवश्यकता असते. सक्षम संस्थेचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर असलेल्या कार्यकारिणीसोबतच गाव, तालुका, जिल्हा पातळीवर कार्यकारिणीचे गठन करण्यात येते. या कार्याला समाजातील सर्व घटकांनी तनमनधनाने सहकार्याची आवश्यकता आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे तर आपलेपणाची गरज आहे.