जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्यास असून संशयीताकडून जळगावसह धरणगाव आणि भडगाव येथून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. दीपक सुमर्या बारेला (27, कर्जाणा, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना चोपडा येथे एक संशयित चोरीच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार संदीप पाटील, अश्रफ शेख, दीपक पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर यांनी सोमवार, 3 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता संशयित दीपक सुमर्या बारेला याच्या चोपडा शहरातील कारगील चौकातून मुसक्या बांधत त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या. संशयिताने या दुचाकी जळगावसह धरणगाव आणि भडगाव तालुक्यातून चोरल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.