तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगावर देवीची मूर्ती पडल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय गोपाळ कोळी असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातल्या जोशीवाडा येथे नवरात्रि निम्मित तयारी सुरु होती. देवीची मूर्ती बऱ्हाणपूर मधून आणण्यासाठी काही तरुण गेले होते. तिकडून परत येताना रात्री बारा वाजेदरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील फाट्याजवळ देवीची मूर्ती संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने मूर्तीखाली दाबून त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर तात्काळ त्यांना मुक्ताईनगर येथे उपचारासाठी दाखल केले असता तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर संजय कोळी यांच्या कुटुंबियांना हि माहिती कळविण्यात आली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला. संजय कोळी हे एमआयडीसी येथील एका कंपनीत खिडक्यांच्या स्टेरिंगचे काम करीत होते.