जळगाव : वावडदा-म्हसावद रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पवन वैजनाथ मंगरुळे (२५, रा. वाकोद ता. जामनेर) हा तरुण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
पवन वैजनाथ मंगरुळे हा वाकोद गावात हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातील राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे ( २५, रा. वाकोद ता. जामनेर) या तरुणासह पवन मंगरुळे हा शनिवार, १ जून रोजी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वावडदा येथून जळगावी जात होता. म्हसावद गावाच्या पुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात पवन मंगरुळे हा जागीच ठार, तर राहुल उर्फ शुभम हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार झाल्यावर राहुल याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी वाकोद गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दाखल करण्यास मदत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.