दुर्दैवी ! जळगाव जिल्हयातील चार विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू; नेमकं काय घडलं ?

जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव, चौथा यावल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

जिया फिरोज पिंजारी, जी शान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल देसले अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. चार पैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर तीनही विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हयातील मृत चार विद्यार्थी हे रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून चारही जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे.

चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.