दुर्दैवी ! ट्रेन पकडताना तोल गेला, हात पडला रुळावर, आले कायमचे अपंगत्व

पाचोरा : येथील रेल्वे स्थानकावर काशी एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवाशी रेल्वे खाली पडल्याने त्याचा डावा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना  घडली असून  त्यांच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू आहे.या घटनेबाबत पाचोरा रेल्वे पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी हल्ली गाडगेबाबा नगर भागात राहत  असलेले  विजय  विठ्ठल माने (वय-५९) हे दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेच्या कामानिमित्त पाचोरा येथून जळगाव येथे काशी एक्सप्रेसने जाण्यासाठी पाचोरा जंक्शनवर आले असता काशी एक्स्प्रेसमध्ये चढताना खाली पडले. पडताच त्यांचा एक हाथ हा रेल्वे रुळावर पडला आणि त्यात त्यांचा डावा हात कापला गेला, त्यात ते प्लॅटफॉर्मच्या कडेला चिपकून राहिल्याने त्यांचा जीव वाचला.  मात्र यात त्यांचा एक हात निकामी झाला असून त्यांना कायमचे अपंगत्व येऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशनचे रामराव इंगळे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता माने यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव हलविण्यात आले.  या ठिकाणी त्यांचेवर उपचार सुरू आहे. सदर घटनेबाबत पाचोरा रेल्वे पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.  विजय माने हे मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीतात.  पत्नी, दोन मुले आणि भावंड असा त्यांचा परिवार आहे.