जळगाव : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस आज शुक्रवार, २३ रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघातात १४ भाविकांचा मृत्यू तर, १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील पोखरा येथून बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही काठमांडूला जात होती. दरम्यान, नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात आज शुक्रवार, २३ रोजी सकाळी ११.३० वाजता या बसला अपघात झाला. एसपी बिरेंद्र शाही यांनी सांगितले की, बस मर्स्यांगडी अंबुखैरेनी नदीत कोसळली आहे. बचावकार्यात लष्कर आणि सशस्त्र दलांची मदत घेतली जात आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यूपी आणि नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असून १३ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झाली नसून काही वेळात संपूर्ण माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.