जळगाव : यात्रेसाठी जाणाऱ्या रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याची घटना १३ रोजी अमळनेर तालुक्यात घडली. यात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव आहे. १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्न ठरले होते. मात्र, तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच १९ बीजे ८९९६ या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन रिक्षासोबत मार्गस्थ झाले.
मेहेरगाव फाट्याजवळ एमएच १९ बीजे १४०५ या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले होते. रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात अश्विनी हिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डोळयासमोर लहान बहिणीचा मृत्यू बघून मोठ्या बहिणीने हंबरडा फोडला. अपघातील जखमी रेखाबाई पाटील आणि वर्षा बोरसे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.