सातारा : देशासह राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती. दरम्यान, भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची जलमंदिर या राहत्या घरी भेट घेतल्याने उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
प्रसारमाध्यमांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता फडणवीसांनी म्हटलं की, उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. यावेळी पहिल्यांदा आम्ही जागावाटप करणार आहोत, जागावाटप झाल्यानंतर ती प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे घोषणा करणार नाही, प्रोसेसनुसार उमेदवारीची घोषणा होईल. चर्चा अनेक आहेत, आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहे. आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील. एकदा कोणत्या जागा लढायच्या यावर ठरलं की तुम्हाला सांगेन. याबाबतीत माझ्यासारख्या नेत्याने बोलणं योग्य नाही. असं म्हणत उदयनराजेंच्या उमेदवारीवरही फडणवीसांनी बोलन टाळलं आहे.
उदयनराजेंची प्रतिक्रिया
खासदार उदयनराजे यांनी उमेदवारीबाबत भाष्य करत मागील लोकसभेवेळी मला लोकांनी राजकीय आत्महत्या करताय असं सांगितलं होतं. अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेचा राजीनामा दिला. राजीनामा देणे म्हणजे तोंडचं काम नव्हते. कोणी निवडून आलेला सरपंच पदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो मात्र, मी ज्या घराण्याचम नाव सांगतो त्या घराण्याचा विचारांशी मी बांधील आहे आणि तत्त्व आणि विचार महत्त्वाचे मानतो. राष्ट्रवादीचे विचार पटत नव्हते म्हणूनच मी भाजपमध्ये आलो. जेव्हा-जेव्हा मी माझे विचार मांडले, त्यावेळी त्यावेळी मी घराचा आहेर देतोय, असं सांगितलं गेलं.