नवी दिल्ली: देशभरातील एक कोटी घरांना दरमहा ३०० युनिट वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने’ची घोषणा केली. सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी ही योजना आणली आहे. या प्रकल्पात ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाईल. शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आणत आहोत.
दरमहा ३०० युनिट मोफत वीज देऊन एक कोटींपेक्षा जास्त घरे उजळण्यासाठी आम्ही या प्रकल्पात ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.आहे. थेट लोकांच्या बँक खात्यात दिल्या जाणाऱ्या भरीव अनुदानापासून ते सवलतीच्या बँक कर्जापर्यंत लोकांवर खर्चाचा कोणताही बोजा पडणार नाही, हे सरकार सुनिश्चित करेल.
सर्व भागधारकाना नॅशनल ऑनलाईन पोर्टलवर एकत्रित केले जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. ही योजना तळागाळात यशस्वी करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि पंचायतींना रूफटॉप सोलर यंत्रणांचा सक्रियपणे प्रचार करण्यास सांगितले जाईल. त्याच वेळी, या योजनेमुळे अधिक उत्पन्न कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल, असे ते म्हणाले.