देशात बर्ड फ्लूचा उद्रेक, माराव्या लागल्या ५००० कोंबड्या

कोरोनानं जगातून काढता पाय घेतला असतानाच मंकीपॉक्सनं भीती वाढवली आणि पुन्हा एकदा या आजारांचं सावट संपूर्ण जगासह भारतावरही पाहायला मिळालं. इथं या दोन आजारांची दहशत कमी होत नाही, तोच आता बर्ड फ्लूनंही पुन्हा एकदा देशात हातपाय पसरले असून, या संसर्गाचं सर्वाधिक संकट पाहता या कारणास्तव तब्बल ५,००० कोंबड्या मारल्याची घटना समोर आली आहे.

ओडिशामध्ये बर्ड फ्लूचं हे संकट आणखी बळावलं असून, पिपिली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाच वेळी अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच राज्य शासनाच्या वतीनं तातडीनं एक पशुवैद्यकिय पथक घटनास्थळी पाठवत तेथून काही नमुने चाचणीसाठी पाठवले. सदर चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळं शनिवारपासूनच या पोल्ट्री फार्मसह या भागातील इतरही कोंबड्या मारण्याचं काम यंत्रणांनी हाती घेतलं.

साथरोग नियंत्रक मंडळाचे महासंचालक जगन्नाथ नंदा यांच्या माहितीनुसार शनिवारी इथं ३०० कोंबड्या मारण्यात आल्या, तर रविवारी ४,७०० कोंबड्या मारल्या गेल्या. येत्या काळात पिपिली येथे २०,००० कोंबड्या/ पक्षी मारले जाणार असून, संसर्गाचा धोका आणखी वाढू नये यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे.