जळगाव : धरणगावजवळील म्हसलेनजीक तरुणावर चाकूहल्ला करीत त्याच्याकडील दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली असून जखमी तरुणाच्या मित्रानेच अन्य साथीदारांच्या मदतीने लूट प्रकरण घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल उर्फ मास चंद्रकांत भालेराव (20, भालोद, ता.यावल) व अविनाश देवेंद्र तायडे (24, अट्रावल, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे असून संशयितांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तक्रारदार राजेंद्र रमेश सूर्यवंशी (35, रा.ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) हा सेंट्रिंग कामाची ठेकेदारी करतो. अमळनेर येथे तो मंगळवार, 23 रोजी दुपारी जाणार होता शिवाय त्याने नवी पेठेतील बँकेतून दोन लाख रुपये काढले मात्र ही बाब सूर्यवंशी याचा मित्र अविनाश देवेंद्र तायडे (24, रा. अट्रावल) याला ठावूक असल्याने त्याने लूटीचा डाव आखला. जळगावहून धरणगावमार्गे दुचाकीने (एम.एच.19 डी.एच.6840) ने निघाल्यानंतर धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी सूर्यवंशी याच्या डोक्यात तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले तसेच त्याची एक्टिवा आणि त्याच्याजवळील दोन लाख रुपये घेऊन पळ काढला.
या गुन्ह्याचा समांतर चौकशी सुरू असताना संशयित हे जवळचेच व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल उर्फ मास चंद्रकांत भालेराव (20, भालोद, ता.यावल) व अविनाश देवेंद्र तायडे (24, अट्रावल, ता.यावल) या दोघांना अटक केली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, श्रीराम पाटील करीत आहे.