दोन वर्षाने येणार्‍या निवडणुकी पूर्वीच गुलाबराव देवकरांना विरोध का?

 

रामदास माळी

जळगाव : विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: माजी मंत्री व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाराबराव देवकर यांना जास्त विरोध दिसून येत आहे. याचे पडसाद प्रदेशाध्यक्षांसमोर उमटल्याने याची चर्चा दुसर्‍या दिवशी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होती.

जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या निर्मितीनंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव देवकर हे विधानसभेत गेले. एकेकाळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांचा लौकीक होता मात्र या निवडणुकीत फाटाफुट झाली. देवकर हे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना पराभूत करून विजय झाले. त्यावेळी त्यांना धरणगावातूनच विरोध होता. धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांनीही त्यावेळी उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र तेव्हा पक्ष प्रमुखांनी त्यांना शांत केले. पक्षाच्या आदेशानुसार ज्ञानेश्‍वर महाजन यांनी देवकरांना मदतही केली. मात्र नंतर धुसफुस सुरूच होती. विशेष म्हणजे जळगाव तालुक्यात सुरेशदादा जैन यांचे प्राबल्य कमी व्हावे म्हणून देवकरांना राज्यमंत्रीपदही दिले गेले. त्यानंतर ‘घरकुल घोटाळा’ प्रकरणावरून त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली मात्र भाजपच्या ‘मोदी’ लाटेत त्यांचा निभाव लागला नाही. तर विधानसभेची उमेदवारी त्यावेळी पुष्पा ज्ञानेश्‍वर महाजन यांना उमेदवारी दिली गेली. या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष त्यावेळी तिसर्‍या स्थानी होता.

शिवसेनेतील फुटीनंतर वाढला उत्साह

शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर जळगाव ग्रामीणसाठी देवकर यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेचे (उद्धव गट) गुलाबराव वाघ तयारीत आहेत. मात्र देवकर यांना पक्षांतर्गत विरोध दिसून येत असून त्याचे पडसाद प्रदेशाध्यक्षांसमोर उमटले. वास्तविक विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. मात्र राष्ट्रवादीतील उत्साह शिगेला पोहोचल्याचाच प्रत्यय येत आहे. प्रदेशाध्यक्षांसमोरील विरोध पाहून देवकरांनीही संताप व्यक्त करत ‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’ असे त्रागा करणारे विधान करून पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन केल्याने ग्रामीण मतदार संघातून देवकरांना पक्षांतर्गत विरोधाला दोन वर्षे अगोरदर पासूनच सामोरे जावे लागत असल्याची प्रचिती येत आहे.