डांभुर्णी, ता यावल: येथील रहिवाशी कृष्णा माणिक कंडारे (30) याने 12 रोजी सकाळी राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील झुडपात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 12 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. सकाळी वाड्यातील नागरिक शौचालयाकडे जात असतांना झुडपात दोरीला लटकलेला मृतदेह पाहून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी कृष्णाच्या कुटुंबियांनी त्याचा लटकलेला मृतदेह पाहून पालकांनी आक्रोश केला. कृष्णा हा व्यसनाआधीन असल्याने नशेतच त्याने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. घटनेची माहिती तातडीने यावल पोलिसांत कळवल्यावर पो. नि. राकेश मांगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची पाहणी करून मृतदेह यावल येथील शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. याबाबत यावल पोलिसांत गळफास घेतल्याची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. नरेंद्र बागुले करीत आहेत. कृष्णाच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण, भावजई असा परिवार आहे.