उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे अपघात प्रकरणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. पुणे कार अपघात प्रकरणी धंगेकर यांनी आरोप केले होते. याच आरोपांवरून आता धंगेकरांना करावा लागणार कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो.
पुणे अपघात प्रकरणानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर चर्चेत आहेत. धंगेकरांनी एकापाठोपाठ एक अशा आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ट्विटरवरुनही त्यांनी काही ट्वीट करत पुण्यात सुरू असलेले गैरप्रकार समोर आणले आहेत. अशातच आता पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी केलेले काही आरोप त्यांना भोवणार असं चित्र दिसतंय. या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी पुणे उत्पादन शुल्क विभागावर आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर अनेक गंभीर आरोप केले होते. याचप्रकरणी आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. मंत्री शंभूराज देसाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धंगेकरांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.
मंत्री शंभूराज देसाईंविरोधात काय म्हणाले धंगेकर?
पुणे अपघात प्रकरणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना रवींद्र धंगेकरांनी जाब विचारत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर रेटकार्ड वाचून दाखवलं आणि त्यासंदर्भात उत्तर द्या, काय कारवाई करणार आताच सांगा, असं विचारत धारेवरही धरलं होतं. त्यासोबतच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधातही बेताल वक्तव्य केल्याचा आरोप शंभूराज देसाईंच्या कार्यालयाकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपल्या रोखठोक सदरातून गंभीर आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांना शिंदेंकडून कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. तीन दिवसांत नोटीशीला उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरं जा, असंही नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अशीच कारवाई आता धंगेकरांनाही मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.