नवी दिल्ली : हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा शनिवारी इस्रायल कडून खातमा करण्यात आला. आज जम्मू काश्मीर मधल्या बुडगम या भागात, या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे. पॅलेस्टाईनी लोकांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्घा करण्यात आली.
हसन नसराल्लाह हा हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. इस्रायलच्या विरोधात अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. मोसाद कडून लेबनॉनच्या बेरूत मध्ये झालेल्या पेजर हल्ल्यानंतर हिजबुल्लाह पुढच्या कारावाईच्या तयारीत होती. त्याच दरम्यान, इस्रायलच्या सुरक्षा दलाने टिपून हिजबुल्लाच्या नेतृत्वाला संपवले.
याच पार्श्वभूमीवर, काश्मीर मधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपला प्रचारदौरा रद्द केला. आपल्या X हँडल वरुन त्यांनी या संदर्भात माहिती दिली. या दु:खाच्या प्रसंगी पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे देखील त्या म्हणाले.
भाजपचे टिकास्त्र
भाजप नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी यावरुन टिका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ” हसन नसराल्लाहच्या मृत्यूचा मुफ्ती यांना एवढा पुळका का वाटतो ? बांग्लादेशात ज्या वेळेस हिंदूंवर हल्ले केले गेले, त्यांचा खून करण्यात आला, तेव्हा मात्र ह्या मूग गिळून गप्प बसल्या होत्या. या मगरीच्या आसवांमागचे सत्य लोकांना चांगलेच ठाऊक आहे.
मध्य पूर्वेत तणावपूर्ण स्थिती.
मागील काही आठवड्यांपासून मध्य पूर्वेत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. इस्राएल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षामुळे, सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येते. हमास आणि हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनांमुळे सामन्य माणसांना दहशतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. त्यातच आता नसराल्लाह याच्या मृत्यूमुळे, या संघर्षाला नवीन वळण शक्यता आहे.