जळगाव : जिल्ह्यातील २२ प्रकल्पांपैकी १९ ग्रामीण प्रकल्पांतील अंगणवाड्यांमधील १,८८९ बालके अतितीव्र कुपोषित श्रेणीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकांच्या नुकत्याच केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली. जिल्ह्यातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एकूण २२ प्रकल्पांतर्गत तीन हजार ९४४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी १९ प्रकल्प ग्रामीण भागातील असून, त्यात तीन हजार ४३५ अंगणवाड्या आहेत. तीन शहरी प्रकल्पात ५०९ अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील तीन हजार ४३५ अंगणवाडी केंद्रात दोन लाख ५७ हजार १३० बालके आहेत. त्यापैकी १८८९ बालके अतितीव्र कुपोषित, ७३२६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत तर उर्वरित २,४७,९१५ बालके सर्वसाधारण श्रेणीत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तीव्र कुपोषित बालकांची संख्या गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी समाजसेवी सस्थांचीदेखील मदत घेतली जाणार असून, यासाठी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सुदृढ बालक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या महिन्यात प्रत्येक अंगणवाडी केंद्र, शाळा, आरोग्य केंद्र आणि गावांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.