धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळले

जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. जननी देवाजी तेलामी व देवू कट्या आतलामी अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये जननी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचा समावेश आहे. जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले, तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते.

ते जादूटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा-चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू जननी तेलामी आणि देवू आतलामी यांनी जादूटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन १ मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले. त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली.

यानंतर त्यांना गावाजवळच्या नात्यात नेऊन जाळले. याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १४ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली.

पाच महिन्यांतील दुसरी घटना
जादूटोण्याच्या संशयावरून हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे.