धुळे : मागील सहा वर्षांपूर्वी झालेले एका किरकोळ भांडणाच्या कारणावरून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात या तरुणाचा मृत्यू झाला. अमोल गुलदगडे असं मृत तरुणाचं नाव आहे. अमोल हा अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला होता. याच परिसरात काल रात्री छोरीया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता.रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथे आले असता त्यांना भांडणाचा आवाज आला. त्या ठिकाणी गेला असता त्याचा भाऊ अमोल रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेला दिसला.
या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते. आदित्य मेढे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार करताना दिसला. ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी अमोल याला तात्काळ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे या पाच जणांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.