जळगाव : शहरातील नंदनवन नगरातील गौतम सोनवणे (२७) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, ७ रोजी सकाळी ७ वा. उघडकीला आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जळगाव शहरातील नंदनवन नगर परिसरात दयावान सोनवणे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवार, ६ जून रोजी रात्री जेवण करून तो राहत्या घरातील वरच्या खोलीत झोपला होता. तर घरातील इतर सर्वजण खालच्या घरात झोपलेले होते.
दरम्यान, मध्यरात्री दयावान याने वरच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवार, ७ रोजी सकाळी ७ वा. त्याचा लहान भाऊ कुंदन हा उठविण्यासाठी गेला असता, ही घटना उघडकीला आली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सोसे यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. मात्र, तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दयावान याला आठ दिवसांपुर्वीच मुलगी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असताना तरूणाच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.