धक्कादायक ! नर्सिंगच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करूणा संतोष बोदडे (२२ रा. वाडोदा ता.यावल ह.मु. दिक्षीत वाडी जळगाव)  असे मृत  विद्यार्थीनीचे नाव आहे.

जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग महाविद्यालयात पहिल्या वर्षाला करूणा बोदडे ही तरूणी शिकत होती. दिक्षीत वाडी परिसरात भाड्याच्या खोलीत मैत्रीणींसोबत ती वास्तव्याला होत्या. दरम्यान तिच्या सोबतच्या सर्व मैत्रिणी ह्या गावाला गेल्या होत्या. त्यामुळे रविवार, ७ एप्रिल रोजी करूणा ही खोलीत एकटीच होती. तिने राहत्या घरात छताला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. तिची एक मैत्रिण सायंकाळी ५ वाजता ही खोलीवर आली असता खोलीचे दार आतून बंद होते.

बराच वेळ तिने दरवाजा ठोठावला परंतू आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खोलीच्या मागच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता करूणाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीसांना देण्यात आली. पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.