धक्कादायक! बँक मॅनेजरनेच टाकला बँकेत डल्ला; तीन कोटी रुपये किमतीचं सोन केलं चोरी

मुंबई : ऑनलाईन बेटिंग च्या नादात चक्क बँक मॅनेजरनेच तीन कोटी रुपये किमतीचं सोन चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार भांडुप पश्चिम येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी एसबीआय बँक मॅनेजरला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज म्हस्के असं आरोपीचं नाव असून ते भांडुप येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत सर्व्हिस  मॅनेजर या पदावर कार्यरीत होते. 27 फेब्रुवारीला रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. अमित कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले.

अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. बँक अधिकारी यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता, ती त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोन दुसरीकडे तारण ठेवले तर, काही सोनं विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोनं परत करतो, असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला, पण बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.