अमळनेर : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाला. जयवंत यशवंत कोळी (वय ३६, रा.मांडळ ता. अमळनेर, जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने त्यातून ही हत्या झाल्याची तालुक्यात चर्चा असून, हा घात की अपघात याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, “जयवंत यांना खोऱ्यानं मारहाण करून त्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवण्यात आले. शेतातून नेहमी वाळूचे ट्रॅक्टर जात असतात. ट्रॅक्टरमुळे भाऊच्या शेताची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. त्यांना बोलायला गेले असता ते दमदाटी करतात. याच वादातून सोमवारी रात्री दीड दोन वाजता, जयवंत हा शेतात असताना त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविण्यात आले”, असा आरोप मयत जयवंत यांच्या भावाने केला आहे.
अन् तहसील कार्यालय गाठलं
जयवंत यांचा अपघात नसून त्यांचा हत्या झाली आहे. त्याचा जीव घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी कुटुंबीयांनी आज थेट जयवंत याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अमळनेर तालुक्यातील तहसील कार्यालयात नेला. “जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही.” असा आक्रमक पवित्रा मयत जयवंत यांच्या नातेवाईकांनी घेतला. यावेळी मयत जयवंत यांची पत्नी तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन काही जणांना ताब्यात घेतले असून इतरांनाही अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी जयवंत यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला. याचदरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.