तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेच्या मंदिरात मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे, सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. मंदिर संस्थानने उपविभागीय गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीच्या अहवालात ही माहिती समोर आली. तुळजा भवानीच्या 27 अलंकारांपैकी चार अलंकार गायब आहेत. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट, 12 पदराच्या 11 पुतळ्यांचे मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गायब आहेत. मंदिर संस्थानने उपविभागीय अधिकारी गणेश यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवण्यात आला. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्या. देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्यांची काही दिवसांपूर्वी मोजदाद करण्यात आली होती. याचा अहवालही जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला. मात्र, या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सोने-चांदीच्या शुद्धतेत तफावत
दरम्यान, तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेतही प्रचंड तफावत आढळून आली. सोन्यात 50 टक्के तूट आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, देवीला वाहण्यासाठी आणलेल्या चार तोळ्याच्या सोन्याच्या पादुका या तांब्याच्या असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने, चांदी शुद्धता तपासणी मशीनमुळे उघडकीस आला. देवीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आली. ही समिती तीन ते चार दिवसांत अहवाल देईल.