राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. भाजपा धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणार आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण हा संविधानाचा अपमान आहे. एका वर्गाला खूश करण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष ओबीसी, एससी, एसटी समाजावर अन्याय करीत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर येथे गुरुवारी भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना शाह म्हणाले, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घालणे, हा इंडिया आघाडीचा उद्देश आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाने मुस्लिमांना वितरित केलेले ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले आहे. राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळेच आम्ही धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणार आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम केले. आधी राज्यात देशी बंदुका बनवल्या जायच्या, आज ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवले जातात. येथे तयार झालेले तोफगोळे एखाद्या दिवशी पाकिस्तानवरही पडू शकतात.राहुल गांधींचे दावे फोल ठरले काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत शाह म्हणाले, राहुल गांधी म्हणायचे की, कलम ३७० हटवले तर जम्मू-काश्मिरात रक्ताच्या नद्या वाहतील.
हा तुमच्या आजीचा काळ नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत आहे. आम्ही घरात घुसून अतिरेक्यांचा खात्मा करतो. ३७० हटविल्यानंतर काश्मिरात एक खडाही उचलला जात नाही. पाच टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. यावेळी काँग्रेसला ४० जागांचा आकडाही पार करता येणार नाही आणि अखिलेश यादव तर ४ जागाही जिंकू शकणार नाही.