मुंबईतल्या धारावीतील मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेचे पथक गेले असता तेथील जमावानं कर्मचारांच्या वाहनांवर हल्ला केला होता. मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी महापालिकेचं पथक मुंबईच्या धारावीत पोहोचलं आणि तणाव निर्माण झाला.
या घटनेनंतर धारावी पोलीस स्टेशनपर्यंत सुमारे ५ हजार लोकांचा जमाव जमल्याचे समोर आले होते. या गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. पोलीस धारावी बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवत होते. बीएमसीच्या विध्वंसाच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ बनवण्यात आल्याचंही तपासात समोर आलं आहे.
या पोस्ट आणि व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागले. बीएमसीच्या कारवाईच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी धारावीतील मशीद परिसरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. याप्रकरणी आता धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवरही दंगल भडकवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १३२, १८९ (१,२), १९०, १८४(४), १९१(२), ३२४(३), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम १३२ अजामीनपात्र आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल कलम १३२ लागू आहे. सध्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.