मुंबई : धाराशीवमधील आंदोलक हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक धाराशीवमध्ये ते मुक्कामी असलेल्या हॉटेलवर पोहोचले होते. यावर संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली.
संदीप देशपांडे म्हणाले की, “राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये घुसलेले आंदोलक कोण होते हे आता सोशल मीडियावर फिरायला लागलं आहे. यातला एक शरद पवार साहेबांचा पदाधिकारी होता आणि एक उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकारी होता. त्यामुळे मराठा आंदोलकाच्या वेशात आपापले पदाधिकारी पेरायचे धंदे सुरु असून ते त्यांनी बंद करायला हवे,” असे ते म्हणाले.
सोमवारी राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आरक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला असता महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, इथे आरक्षणाची गरजच नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रात्री राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये मराठा आंदोलक गेले. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.