धार्मिक संघर्ष टळला, वाद पेटता पेटता समजुतीने मिटला

इंदूर : धार्मिक सामंजस्य टिकवण्यासाठी सिंधी समाज आणि शिख समाज यांनी समजूतदारीची भूमिका घेतल्याने मोठा संघर्ष टळला आहे. इंदूर शहरातील सिंधी समाजाने आपल्या देवळांमधून गुरू ग्रंथसाहेब यांच्या सुमारे ८० प्रती हलवल्याचे व या प्रती इमली  गुरूद्वाराकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळांमध्ये शिख धर्माव्यतिरिक्त अन्य मूर्ती वा ग्रंथांचे पूजन होत असल्याने गुरू ग्रंथसाहेबाचा योग्य मान राखला जात नाही सबब तुम्ही देवळातून ग्रंथसाहेब वगळता अन्य मूर्ती हलवा, अशी मागणी निहंग शिखांनी केली होती. मागणी करणारी ही मंडळी अमृतसरहून इंदूर येथे आली होती. ग्रंथसाहेबाच्या तथाकथित अपमानासाठी ही मंडळी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठीही गेली होती. ग्रंथसाहेब जिथे ठेवला व पुजला जातो ती वास्तू गुरूद्वारा म्हणून जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. ग्रंथसाहेबाच्या पूजनासाठी आमचे ग्रंथी देवळात येतील आणि त्यांना पूजा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे, असे निहंग शिखांचे म्हणणे होते. यानंतर त्यांनी सिंधी गुरूद्वाराला भेट देऊन तेथील प्रत स्वतःच ताब्यात घेतली.

यानंतर सिंधी समाजाने एक समिती नेमून यावर विचार विनिमय केला व दोन समाजातील कटुता टाळण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या एक दिवस अगोदरच प्रती शिख गुरूद्वाराकडे देण्यात आल्या. अत्यंत जड अंतःकरणाने सिंधी समाजाने वरील निर्णय घेतला आहे. या प्रती कित्येक दशकापासून इथे पुजल्या जात होत्या. ग्रंथसाहेबाचे पूजन करण्याची प्रथा सिंधी समाजात कित्येक शतकांची आहे. गुरू नानक सिंध प्रांतातआले होते व सिंधी समाजावर त्यांच्या शिकवणुकीचा पगडा होता. त्यांच्या देवळांमध्ये एका बाजूला ग्रंथसाहेब तर दुसऱ्या बाजूला अन्य मूर्ती व गीतेची प्रत ठेवली जात असे. ग्रंथसाहेबाचे पूजन सिंधी समाज आपल्या पद्धतीने करत असे. ही पद्धत व शिख समाजाची पद्धत यामध्ये फरक आहे. ते पसंत न पडल्यामुळे निहंग शिखांनी वरील मागणी केली. हे प्रकार डिसेंबर महिन्यापासून चालू होते.