धुळे । धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या केली. आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही घटना समोर आल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे.
प्रविण मानसिंग गिरासे (वय 52), पत्नी दिपा प्रविण गिरासे (वय 44) व मुले चि. मितेश गिरासे ( वय 13 ) आणि चि. सोहम गिरासे( वय 18 ) असे मृतांची नाव आहे. कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते.
मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी सोन्यासारख्या दोन लेकरांसह आत्महत्या का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस तपासातून या सगळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.