धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच लोकसभा मतदारसंघात सेवा बजावणाऱ्या तीन पोलीस निरीक्षकांसह एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन बदली स्थळी हजर होऊन पदभार घ्यावा, असे बदली आदेशात नमूद आहे आझादनगर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची थाळनेर प्रभारी तर साक्री पोलीस ठाण्याचे निवृत्ती पवार यांची आझाद नगर पोलीस ठाण्यात तर पश्चिम देवपूरचे हर्षवर्धन गवळी यांची साक्री पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.
देवपूरचे सहाय्यक निरीक्षक शकील रशीद शेख यांची शिरपूर तालुका, पिंपळनेरचे जयेश खलाणे यांची सोनगीर पोलीस ठाणे, सोनगीरचे सचिन कापडणीस यांची पिंपळनेर पोलीस ठाणे, थाळनेरचे दीपक पावरा यांची धुळे नियंत्रण कक्ष, धुळे शहरचे सचिन शिरसाठ यांची पश्चिम देवपूर पोलीस ठाणे प्रभारी, शिरपूर तालुक्याचे उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे यांची जिविशा, धुळे तर सोनगीरचे उपनिरीक्षक विजय चौरे यांची पिंपळनेर पोलीस ठाणे व पिंपळनेरचे उपनिरीक्षक अमित माळी यांची धुळे स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.