नंदुरबार जिल्ह्यात भरधाव वाहन उलटले; मंडळाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

xr:d:DAFtd8oCXa8:2678,j:5606280453147525784,t:24041406

नंदुरबार : शहादा तालुक्यातील मंदाणे येथील कार्यक्रम आपटून शहादाकडे जाणारे वाहन असलोद गावालगतच्या वळण रस्त्यावर उलटल्याने मंडळाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर नायब तहसीलदारासह एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, १२ रोजी घडली. प्रदीप नथ्थू पाटील ( ५६) असे मृत मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे.

शहादा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विजय दयाराम साळवे, मंडळाधिकारी प्रदीप पाटील (५६) आणि मंडळाधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी हे तिघेही शुक्रवारी मंदाणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर ( एमएच ०२ ३७०८) या वाहनाने शहाद्याकडे परत येत असताना असलोद गावालगत भरधाव वेगातील वाहन उलटले होते.

यात मंडळाधिकारी प्रदीप नथ्थू पाटील यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नायब तहसीलदार विजय दयाराम साळवे, मंडळाधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी जखमी झाले.

या जखमींना असलोद ग्रामस्थांच्या मदतीने शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंडळ अधिकारी प्रदीप पाटील यांच्यावर शहादा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.