नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात नागपूरचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील 20 नेत्यांचा समावेश आहे. काल, 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या या यादीत नितीन गडकरी यांचे नाव येताच नागपूर भाजपमध्ये मोठ्या उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे. नागपूरातून नितीन गडकरींच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल या बाबत अद्याप कुठलेही नाव पुढे आलेले नसतांना नागपूरकरांनी आपला कौल जाहीर करून टाकल्याचे बघायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकासकाम आणि लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी, या मागणीसाठी सर्वसामान्य नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत. हातात नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत? अशा आशयाचे बॅनर घेत नागपूरकरांनी ही मोहीम राबवली आहे.