जळगाव : ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्हा राज्यात सर्वाधिक ‘हॉट’ ठरतोय. वेलनेस वेदर या खासगी संस्थेने जळगावचे कमाल तापमान तब्बल ४६.७ अंश तापमानाची नोंद केली आहे. तर ममुराबादच्या शासकीय हवामान केंद्रात जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४५ अंश नोंदला गेला.
जळगाव जिल्ह्यात आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली. केवळ आठवड्याभरात कमाल तापमानातील फरक ७ ते ८ अंशांवर पोचला असून, त्यामुळे नागरिक या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत. जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे गेल्या आठवड्यापासून तापमान ४३ ते ४४.९ अंशांवर नोंदले जात आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश नोंदले गेले, तर वेलनेस वेदर या खासगी एजन्सीच्या दाव्यानुसार जळगावचे कमाल तापमान ४७.२ अंश होते. दुपारी तीन ते पावणे चार दरम्यान ४८.५ अंश तापमान असल्याची जाणीव होत होती.
जिल्ह्यात सर्वत्र पारा ४५ पार
भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोचला आहे. तापमान वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील रस्ते र्निमनूष्य होताहेत. महामार्गावरील वाहतूकही दुपारी थांबलेली दिसते. अनेक वाहनधारक महामार्गा शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत थांबलेली दिसतात. तर तापमानातील वाढीचा पक्षांवरही परिणाम झाला आहे. दुपारी बारापासूनच कावळे, कबुतर, चिमण्या आदी पक्षी दिसेनासे होतात.