नागरिकांनो, काळजी घ्या! जळगावात उष्मघाताचा दुसरा बळी

जळगाव : जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जळगावचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरामध्ये नाव नोंदविण्यात आलं आहे. मे हीटमुळे जिल्ह्यात उष्माघाताचा त्रास होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

कजगाव ता.चाळीसगाव येथील अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) या तरुणाचा  उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  दरम्यान, अमळनेर शहरातील  रुपाली राजपूत  या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी घडली होती.

वाढत्या तापमानामुळे शनिवारी (ता.१३) संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. नेहमी हसतमुख असलेला अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता.

अक्षयच्‍या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अक्षयचा दीड वर्षीय मुलगा आपल्या वडिलांना आर्त हाक देत होता. मृताच्या पत्नी, आई, वडील, व भावांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. दरम्यान अक्षयला श्रद्धांजली म्हणून सुवर्णकार समाज बांधवांनी तसेच संपूर्ण सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती.