नाना पटोलेंचे अधिकार काढले; काँग्रेस हायकमांडचा निर्णय

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांची जागा वाटपासंदर्भातील बैठक गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी नरिमन पाँईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत जागा वाटपाचा तीढा सुटण्याऐवजी नाराजीचे सूर अधिक आळवले गेले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आयत्यावेळी निमंत्रण पाठविण्यात आल्याने ते भलते नाराज झाले. नाना पटोले यांच्या सहीने पाठविण्यात आलेल्या निमंत्रण पत्रावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील घटकपक्षांत जागावाटपासंदर्भात वाटाघाटी सुरू असताना काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकार काढून घेतले आहेत. घटकपक्षांसोबत चर्चा किंवा आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार यापुढे अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांना असतील, असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले .