मुंबई: नाना पटोले कुठल्याही एका पक्षात आणि एका पदावर टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. भाजपला पक्ष फोडल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत होती. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “माझा काँग्रेस नेत्यांवर असा आरोप आहे की, त्यांना त्यांचा पक्ष आणि पक्षातील नेत्यांना सांभाळता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षात मोट बांधता येत नाही. आज हे सगळे मोठे नेते इतक्या वर्षांची त्यांची पक्षातली पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत? कारण आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे त्यावरून पक्ष कुठल्या दिशेने चालला हेच कुणाला समजत नाही.”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाना पटोलेंनाही आम्ही प्रवेश दिलाच होता. पण ते कुठल्याही एका ठिकाणी आणि एका पदावर टिकूच शकत नाही, ही त्यांची सवय आहे. त्यांना अध्यक्ष बनवलं होतं तेही ते सोडून गेलेत. त्यामुळे ते सांगतात ते फार गांभीर्याने घेऊ नका.” मंगळवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.