नाशिकच्या जागेवरून भुजबळांच्या वक्तव्याने वाद वाढला, शिंदे गट पुन्हा आक्रमक

Lok Sabha Election 2024 : नशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमधील संघर्ष सुरूच आहे. अश्यातच छगन भुजबळ यांच्या एका दाव्याने पुन्हा महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. उमेदवारीसाठी मी मागणी केली नव्हती, पण दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याला तात्काळ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची नाशिकची जागा आम्ही सोडणार नाही’ असे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.

भुजबळ यांच्या दाव्यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “आता कुणाची उमेदवारी दिल्लीहून आली असे म्हणतात, याबद्दल आम्हाला कल्पना नाही. पण अशाप्रकारे कुणाला दिल्लीहून उमेदवारी मिळाली म्हणून उभे राहायचं सांगितलं असेल, तर ते समोर येईलच. पण, ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे. जिथून एक माणूस दोन वेळा मोठ्या मताने जिंकून येतो, ती जागा काढून घेणे म्हणजे शिवसैनिकांचा अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे आणि असा प्रकार आम्ही होऊ देणार नाही, असं शिरसाट म्हणाले.