नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सभा घेणार आहेत. बसवंत येथील कांदा मार्केटच्या मैदानावर दुपारी अडीच वाजता ही सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी भाषणातून कोणावर वाग्बाण सोडतात याकडे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या तीन टप्यातील मतदान पार पडल्यानंतर उर्वरित चौथ्या व पाचव्या टप्यातील जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेकरिता यापूर्वी १० तारखेचा मुहूर्त काढण्यात आला होता.
परंतु, शुक्रवारी अक्षय्य तृतीया असल्याने प्रचारसभेला गर्दी कमी होईल, अशी भीती युतीमधील तिन्ही पक्षांना होती. त्यामुळे सभेची तारीख बदलावी, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती.त्यानुसार आता १५ तारखेला सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून, महायुतीमधील तिन्ही मित्रपक्ष कामाला लागले आहेत