नाशिक भाजपाचाच बालेकिल्ला : गिरीश महाजन वादविवाद नको, सामंजस्याने तोडगा काढावा

नाशिक: लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत पेच निर्माण झाला असून एकीकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी दावा करीत प्रचारास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवर दावा केला आहे. अशातच भाजपा नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही पक्षांतील इच्छुक नेत्यांची हवा काढत नाशिक हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या जागेवरून वादविवाद नको, सांमजस्याने तोडगा काढावा आसे विधान केले आहे.

महाजन म्हणाले की, सगळ्यांनाच वाटते की, नाशिकची जागा आपल्याला मिळायला हवी. पण असे होत नाही, एकत्र राहायचे असेल तर वाद टाळायला हवे. एकमेकांविरोधात कुरघाडी करून निवडणूक जिंकता येत नाही. नाशिकमध्ये शिवसनेचे विद्यमान खासदार असल्याने तेथे पुन्हा त्यांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादीला वाटते ही जागा त्यांना मिळावी. नाशिक जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत, त्यामुळे हा भाजपाचाच बालेकिल्ला आहे.

ते पुढे म्हणाले की, शेवटी महायुती आहे, जागेच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. मित्रपक्षाला काही हक्काच्य जागा द्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे.

एक-दोन दिवसांत अंतिम यादी येईल

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, भुजबळांना कोणी काय सांगितले याची कल्पना मला नाही. दोन दिवसात अंतिम यादी येईल, वेळ कमी आहे. गोडसे काय सगळ्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला नाशिकची जागा मिळावी. कुणाच्या म्हटल्याने मतदारसंघावर त्यांचा दावा होत नाही. पक्षाचे नेते जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल असा टोला महाजन यांनी लगावला.