ना. गिरीश महाजन: कोळी बांधवांच्या समस्यांच्या निराकरणासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

जळगाव ः कोळी समाजबाधवांच्या अन्नत्याग आंदोलनाला रविवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण आदींनी भेट दिली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना आश्वस्त केले की, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. हा प्रश्न येथे सुटणार नाही, मराठा, धनगर समाजाप्रमाणे कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री व अधिकाऱ्यांसोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, यासाठी वेळ द्यावे लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मंत्री अनिल पाटील यांनी सकाळी आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी मंत्री पाटील यांनी आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. कोळी बांधवांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्रावर तोडगा काढण्यात येईल असेही त्यांनी आश्वासित केले.