जळगाव; डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झालेत. गरीब लोक येत नाहीत, मात्र मध्यम वर्गातील लोक वृद्धाश्रमात येतात. मुलगा, सून, आई-वडिलांना वागवत नाही. मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, संघपती दलूभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, मातोश्री आनंदाश्रमाच्या प्रकल्पप्रमुख अनिता कांकरिया उपस्थित होते.
‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू
ना. महाजन पुढे म्हणाले की, मूकबधिर, गतीमंद मुलांचा सांभाळ करून त्यांना शिकवणे, वाढीस लावणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. ‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू आहे. उपेक्षित आणि गरजू घटकांना आधार देणे अशा लोकाभिमुख उपक्रमांचाही केशवस्मृती विस्तार करताना दिसत आहे. अशा कामांसाठी आपल्या उत्पन्नातील काही वाटा खर्च करावा, यापेक्षा मोठे समाधान नाही.
अतिशय चांगल्याप्रकारे वृद्धांना सेवा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कोरोना काळात मदत करण्याची इच्छा असूनदेखील मदत करता येत नव्हती. त्याकाळी जैन परिवाराने पाच हजार लोकांना जेवण देण्याचे कार्य केले आहे. मुलांनी नाकारलेल्या आई वडिलांना समावून घेण्याचे काम मातोश्री आनंदाश्रम करत आहे. हे रोपटे कै. डॉ. अविनाश आचार्य यांनी लावले, याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. वृद्धाश्रमात अतिशय चांगल्याप्रकारे वृद्धांना सेवा मिळत आहे. त्यांच्या निवासाची उत्तम सोय केली आहे हे केशव स्मृती प्रतिष्ठानाचे मोठे समाज कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण
अशोक जैन म्हणाले की, आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 टक्के काम महिनाभरात पूर्ण होईल. या ठिकाणी 100 आजी-आजोबा राहतील. त्यांचे जीवन या ठिकाणी सुखी व समाधानी राहील, अशी व्यवस्था व रचना आहे. मोठ्या भाऊंच्या शिकवणीतून जैन समूह सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढाकार घेता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली
‘आम्ही दहाजण मिळून डॉ.आचार्य’
भरत अमळकर म्हणाले की, आचार्य दादांनी काम करताना माणसांची टीम उभी केली होती. डॉ. आचार्य आज आपल्यात नाहीत, पण आम्ही दहाजण मिळून नक्की डॉ. आचार्य आहोत. समूहाच्या हातून दादांचे नाव खाली जाईल, अशी कृती झाली नाही आणि होणार नाही, सेवेतील ही माणसे दीपस्तंभासारखे आहेत. अनिता कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संध्या कांकरिया यांनी, तर आभार सुनील पाटील यांनी मानले.
वृद्धाश्रमांसाठीचे अनुदान पुन्हा सुरू करावे
आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचे काम आचार्य दादांपासून केले गेले असून, ते काम भरतदादा अमळकर यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. वृद्धाश्रमांसाठी युतीच्या काळात अनुदान दिले जात होते, ते दोघा मंत्र्यांनी पुन्हा सुरू केल्यास वृद्धाश्रम चालवणे सोपे होईल. आगामी काळात युवकांना आपल्या आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणार नाही, हा संदेश दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.