सध्या 3 पक्षाचे सरकार आहे. महाविकास आघाडीच खरा शत्रू आहे. विरोधाला विरोध न करता कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. राज्यात आगामी निवडणुकीत 45 खासदार व 200 पेक्षा अधिक आमदार महायुतीचे निवडून येणार असून, जिल्ह्यातून 2 आमदार शिवसेनेचे असतील, असा आत्मविश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. नंदुरबार येथे शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात घेण्यात आलेल्या मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्राला महाविकास आघाडीने खड्ड्यात घातले आहे.
त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शत्रू समजावे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत.आगामी निवडणुकांमध्ये कोणाला तिकीट द्यायचे याचा विचार कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सोडून द्यायचा. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी अधक्ष वकील पाटील, पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भील,जि.प सदस्य विजय पराडके, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, शिवसेना महिला जिल्हा
प्रमुख ज्योती पाटील, बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,शिवसेना तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याला जि.प सदस्य,नगरसेवक, पं.स सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी,सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांमुळे समान न्याय
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांवर टीका करीत म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिक लढवय्ये आहेत. त्यांच्यावर नेहमी अन्याय होत होता.परंतु, आता राष्ट्रवादीचे पालकमंत्री असल्याने ते सर्वांना समान न्याय देतील.
तीन हजार युवकांच्या 1500 कुटुंबियांना रोजगार
जिल्ह्यात बेरोजगारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेजारील गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुटुंब स्थलांतरित होत असतात तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भालेर येथे 297 हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर केली होती. परंतु, त्यातही राजकारण झाले. युवकांना रोजगार मिळावा यासाठी भालेर एमआयडीसीमध्ये औद्योगिक प्रकल्प उभारून 3 हजार जणांच्या 1500 कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे माजी आ.रघुवंशी यांनी सांगितले.