भुसावळ : रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यातील फौजदारांवर लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
निभोरा पोलीस ठाण्याचे फौजदार कैलास ठाकूर यांना एका प्रकरणात दहा हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवार, 12 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.
यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची इर्टिगा वाहन जप्त करण्यात आले होते. तक्रारदार यांचे जप्त वाहन सोडून देण्याचे मोबदल्यात प्रथम 15,000/ रु लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी 12 जून 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगाव कार्यालयात तक्रार दिली. 12 जून रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील कैलास ठाकूर यांनी यांनी प्रथम 15,000/ रु व तडजोडीअंती 10,000/ रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 12 जून रोजी फौजदार ठाकूर यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. सापळा पथकात अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक, सफौ. दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे यांचा समावेश होता. पथकास पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर , पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे , पोना बाळु मराठे, पोकॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. प्रणेश ठाकूर यांचे सहकार्य लाभले.