निकालापूर्वीच विजयाची मिठाई वाटणाऱ्या काँग्रेसची ‘हाय राम ये क्या हुआ’ ची अवस्था

Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळालेला आहे. कालपर्यंत येथे काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तेथे आज भाजपच्या विजयाचे वारे वाहू लागले आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर आज मतमोजणी सुरू होती . निकालात सुरुवातीला काँग्रेसने प्रचंड आघाडी घेतली होती. मात्र दुपार नंतर ट्रेंड बदलल्याने भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसची हवा आता शांत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. कालांतराने काँग्रेसची आघाडी मजबूत होत गेली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले. फोटो आणि सेल्फी काढण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांना हरियाणात विजयाची इतकी आशा होती की ते ढोल-ताशांच्या तालावर ही नाचले.

पण हरियाणा निवडणुकीचे ट्रेंड झपाट्याने बदलले. भाजप आणि काँग्रेसमध्ये हरियाणात चुरशीची लढत झाली. मात् आता भाजपने हरियाणामध्ये बहुमत मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता पाहायला मिळत आहे.