नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली, जम्मूच्या कोटली भागात अपघात, 12 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बस अमृतसरहून कटराकडे जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थली दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 70-75 लोक प्रवास करत होते. त्यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला. काहींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जम्मूपासून 30 किमी अंतरावर असलेल्या झज्जर कोटली भागात बसचा अपघात झाला. बसमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेले प्रवासी देखील होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या भागातील स्थानिक लोक आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरु केले.