रत्नागिरी: भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. या सभेच्या पूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. गुहागरला जाण्यापूर्वी निलेश राणे यांचा चिपळून येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राणेंचा ताफा पुढे निघूव गेल्यानंतर ताफ्यातील गाड्यांवर मागून दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचे पाहायला मिळाले. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला तेथून पळविले.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपचे नेते निलेश राणे हे गुहागर येथे माझ्या मतदारसंघात सभा घेण्याकरिता येणार अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती. टीझर व्हायरल करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या कार्यलयाबाहेर गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार अशाप्रकारचे बॅनर झेंडे लावण्यात आले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मुंबई गोवा महामार्ग परिसर तसेच चिपळूण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.