तरुण भारत लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानंतर आता या लसीच्या किमतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकावाटे देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसीची किंमत खासगी रूग्णालयांमध्ये 800 + 5% GST म्हणजेच १००० रुपये मोजावे लागतील तर, सरकारी रूग्णालयांमध्ये यासाठी 325 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोवॅक्सिन किंवा कोविशील्डने पूर्णपणे लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी इंट्रानेझल लसीला यापूर्वी बूस्टर शॉट म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारीच्या अखेरीस ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ही लस जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.
भारतात गेल्या २४ तासात एकूण १५७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या ४,४६,७७,४५९ झाली असून, सध्या देशभरात ३,४२१ रूग्णांवर उपचार चालू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८० टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. तर, दैनिक संसर्ग दर ०.३२ टक्के इतका आहे.