जळगाव : अल्पवयीन तरुणीवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल आज सोमवार, ४ रोजी दुपारी ३ वाजता दिला. योगेश दिनकर कोळी (रा.डांगरी ता. अमळनेर) असे आरोपीचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन तरुणी ही वास्तव्यास आहे. सदर तरुणी ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. दरम्यान, आरोपी योगेश दिनकर कोळी हा तिच्या मागून आला आणि तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच “जर तू ओरडली तर, तुला जीवेठार मारीन” अशी धमकी दिली.
पीडित तरुणी रात्री साडेबारा वाजता घरी गेल्यावर, तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी योगेश दिनकर कोळीविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल करण्यात आले.
न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित तरुणी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ताराचंद जावळे यांनी काम मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय वकील सुरेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.