नोकरीचे आमिष दाखवून 5 लाख 40 हजारांची फसवणूक, पोलिसांनी केली अटक

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात जागा निघाल्याची खोटी बतावणी करत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एकाकडून वेळोवेळी 5 लाख 40 हजार रुपये घेतले. मात्र, 2 वर्षे उलटूनही नोकरी न लागल्याने तसेच वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीमुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताच्या फिर्यादीवरून एकाविरुध्द पाचोरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गन्हा दाखल करण्यात आला. काही तासातच आरोपीस अमळनेर येथून पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील रहिवाशी इक्बाल अल्लाउद्दीन पिंजारी (वय-38) हा ट्रक चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत आहे. इक्बाल पिंजारी यांची पत्नी हिचा अमळनेरच्या तांबापुरातील मावस भाऊ अमिन मन्वर पिंजारी हा नोव्हेंबर 2020 मध्ये इक्बाल पिंजारी यांच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने जळगाव जिल्ह्यातील भमिअभिलेख विभागात जागा निघाल्या असून तुम्हाला नोकरी लावून देतो असे सांगितले. मात्र इक्बाल पिंजारी यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. दरम्यान, अमिन पिंजारी वारंवार इक्बाल पिंजारी यांच्याकडे येवून त्यांना नोकरीचे आमिष दाखवत होता, अखेर इक्बाल पिंजारी यांनी होकार देत त्यांनी ट्रक व्यवसायातून जमवलेले 3 लाख रुपये 2 मार्च 2021 रोजी अमिन पिंजारी याच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर मोबाईलद्वारे पाठविले.

त्यानंतर 15 मार्च 2021 रोजी 1 लाख रुपये, 20 एप्रिल 2021 रोजी 40 हजार रुपये, 28 एप्रिल 2021 रोजी 10 हजार रुपये, 3 मे 2021 रोजी 50 हजार रुपये व 18 जून 2021 रोजी 40 हजार रुपये असे एकुण 5 लाख 40 हजार रुपये अमिन पिंजारी याच्या बँक खात्यावर पाठविले. मात्र, अमिन पिंजारी याच्याकडून अजून पैशांची मागणी सुरुच होती, तर अडीच वर्ष होवुन ही नोकरी मिळत नसल्याने अखेर पाचोरा पोलीस स्टेशन गाठले व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना फसवणुकीबाबत सविस्तर माहिती कथन केली. पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. इक्बाल पिंजारी (रा. अंतुर्ली ता.पाचोरा) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्याने अमीन पिंजारी (रा.तांबापुरा,अमळनेर) विरोधात फसवणुकीचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पाचोरा पोलिसांनी काही तासातच अटक केली. शनिवारी या आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.