जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरातील वडनेरी फाटा याठिकाणी 5 डिसेंबरपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेस प्रारंभ झाला होता. पहिल्या पाच दिवसात 40 लाख भाविकांनी कथेला हजेरी लावली. त्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक 12 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी कथेला हजेरी लावली. कथेच्या सात दिवसांच्या काळात 60 लाख शिवभक्त शिवमहापुण कथा श्रवण करण्यासाठी वडनगरी कथास्थळी दाखल झाले. नाशिक येथे होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला 60 लाख भाविक दाखल होतात. तेवढी गर्दी जळगाव जिल्ह्यातील वडनगरी कथास्थळी झाल्याचे पाहायला मिळाली. रविवारी कथेच्या सहाव्या दिवशी नजर पडेल तिथे शिवभक्त रस्त्यांवरील वाहनासह मंडपाच्या बाहेर कथा श्रवण करण्यासाठी बसल्याचे दिसून आले.
सहाव्या दिवशी शिवमहापुराण कथेत शिवभक्तांच्या उपस्थितीचे विराट दर्शन जगाला पाहायला मिळाले. हजारो नव्हे तर लाखोंच्या मुखातून ‘शिवनामा’चा जयजयकार यावेळी करण्यात आला. कथेच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे भाविकांचे हाल झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन शिस्तबध्द झाले. कथेच्या दुसऱ्या दिवसापासून भाविकांची गैरसोय दूर झाली. पायी चालणाऱ्यांसाठी व वाहनांसाठी अशा रस्त्यांची दोन भागात विभागणी केल्याने वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी दूर झाल्या.
गर्दीने फुलले रस्ते
कथेच्या सहाव्या दिवशी रविवारी कानळदा रस्ता दिवसभर गर्दीने शिवभक्तांनी फुललला होता. मिळेल त्या मार्गाने आणि वाहनाने अन् पायपीट करीत कथास्थळ भाविकांनी गाठले. कथास्थळी जाण्यासाठी सकाळी 7 वाजेपासूनच शहरातील नागरीक बाहेर पडले होते. तसेच जिल्हाभरातील गावागावातून खाजगी वाहनाने भाविकांचा सकाळपासून ओघ वाढाला होता. त्यामुळे संध्याकाळी शहरातही मोठी गर्दी झाली होती.
अन्नदानाचा ओघ वाढला
शिवमहापुराण कथा श्रवणासाठी होणारी शिवमक्तांची गर्दी वाढत गेल्याने मंडपातही मुक्कामी थांबणाऱ्या शिवभक्तांची संख्याही वाढली. त्यांना जेवण, नाष्टा, पाणी, चहा, उपवासाचा फराळ आदी वस्तू देण्यासाठी अन्नदान करणाऱ्यांचा ओघ दुसऱ्या दिवसापासूनच वाढला. मात्र आयोजकांतर्फे मंडपात थांबलेल्या लाखो भाविकांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. विविध खाद्य पदार्थ मंडपात मुक्कामी थांबलेल्या भाविकांना शासकीय राजकीय, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन भाविकांपर्यत पोहचविले.
भोजन व्यवस्थेसाठी जळगावकरांचे परिश्रम
शिवमहापुराण कथेला दररोज 8 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याने आणि मुक्काला मंडपात 4 ते 5 लाख भाविक दररोज असल्याने नियोजन कमी जास्त होणारच. मात्र भोजन व्यवस्थेत आयोजकांसह व त्यात सहयोग जिल्हाभरातील शासकीय, राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सर्वच हिंदुत्ववादी संघटनानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने व्यवस्थेला विराट स्वरुप आले. दररोज आठ लाख भाविकांची व्यवस्था करणे साधारण बाब नाही. मात्र जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मंडळीच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. देशात कोणत्याही शिवकथेत एवढे भोजन व नाष्टा भाविकांना आजपर्यंत कुणी दिला नाही. एवढा जळगावकरांनी सहा दिवसात भाविकांना दिल्याने जिल्ह्यातील दानशुरांचे शिवकथाकार पंडित मिश्रा यांनी भरभरून कौतुक केले.
6 दिवसात 52 लाख भाविक शिवकथेत नतमस्तक
पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला 6 दिवसात 52 लाखांहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली. शेवटच्या सातव्या दिवशी सोमवारी अजून 10 लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. रविवारी सुमारे 12 लाखांपेक्षा अधिक शिवभक्त कथास्थळी दाखल झाल्याने शिवमहापुराण कथेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. महादेवावर असलेल्या श्रध्देने शिवभक्तांनी कथा श्रवणासाठी अलोट गर्दी केली होती. रविवारच्या कथा श्रवणासाठी शनिवारच 6 लाखांपेक्षा अधिक भाविक मंडपात रात्रीच दाखल झाले होते.